Connect with us

Uncensored मराठी

बोरिवलीतील कोरा केंद्र उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी सज्ज

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 13th June 2022

बोरिवलीतील कोरा केंद्रातील उड्डाणपुलाचे बांधकाम तब्बल 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पूर्ण झाले आहे. नवीन उड्डाणपुलामुळे, प्रवाशांना आता बोरिवली (पश्चिम) मधील सर्वात वर्दळीच्या भागात पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक चांगली मिळेल. मात्र, बांधकामाला झालेल्या दिरंगाईमुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च १२१ कोटींवरून १७३ कोटींवर गेला आहे.

२०१८ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कोरा केंद्र येथे, लिंक रोड ते SV रोड पर्यंत सुमारे ९३७ मीटर लांबी आणि १५.३ मीटर रुंदी असलेला उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली. हा उड्डाणपूल कोरा केंद्र मैदानाजवळील भागातून जातो आणि दोन व्यस्त जंक्शन – कल्पना चावला चौक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक इथून बायपास करत – तो लिंक रोडला जोडतो. FM करिअप्पा उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर वाहनचालकांना कोरा केंद्र उड्डाणपुलामार्गे लिंक रोडला थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. उड्डाणपुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाले होते, परंतु कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान ते थांबविण्यात आले.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वरून लिंक रोडकडे जाणारे वाहनधारक FM करिअप्पा फ्लायओव्हर घेतात, जो SV रोडवर संपतो. मात्र सहसा त्यांना दोन जंक्शनवर ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो. “लिंक रोडपर्यंत पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात, नवीन उड्डाणपुलामुळे पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी चांगली होईल,” असे BMC पुलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून तो लवकरच वाहनधारकांसाठी खुला करण्यात येईल”, अशी माहिती पालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. दरम्यान, BMC ने आणखी ८६० मीटर जोडून उड्डाणपूल WEH पर्यंत वाढवण्याचे काम सुरू केले आहे.

Uncensored मराठी

कुर्ल्यातील चार मजली इमारत कोसळली; १९ जणांचा मृत्यू तर १४ जण जखमी

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 29th June 2022

मुंबईतील कुर्ला येथील चार मजली इमारत सोमवारी रात्री ११:४५ च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये १४ जण जखमी, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आणि आतापर्यंत जखमीपैकी १० जणांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात सुद्धा आले आहे, अशी माहिती पीटीआयने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यामार्फत दिली आहे. 

कुर्ल्यातील नाईक नगर सोसायटीत असलेल्या रहिवासी इमारतीची डी विंग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली असून त्याच सोसायटीतील दुसऱ्या विंगचा पहिला मजला देखील खचला आणि पाहता पाहता इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली. इमारत कोसळण्याच्या प्रचंड आवाजाने आजूबाजूचे रहिवासी घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलांच्या सात गाड्या, दोन रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल, पोलीसांसह स्थानिक रहिवाशानी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. हे बचावकार्य सोमावारी मध्यरात्री पासून ते मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

“इमारत जीर्ण झाली असून, २०१३ पासून प्रथम दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि नंतर इमारत पाडण्याची देखील नोटिस देण्यात आली होती,” असे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले. 

कोसळलेली इमारत ही मोडकळीस आलेल्या चार इमारतींच्या वसाहतीतील होती. त्यांना पाच ते सहा वर्षांपूर्वीच जागा सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही, रहिवासी राहतच होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच, मृत्यूमुखी पडलेले, जखमी झालेले अनेक जण हे मुळ रहिवासी नसून भाडेकरू होते. या इमारतीतील एकूण २४ घरापैकी १६ घऱे ही भाडेतत्वावर दिली होती. 

महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने सोमवारी रात्री उशिरा कुर्ला येथे जाऊन इमारत कोसळलेल्या जागेचा आढावा घेतला. “महापालिकेने नोटीस बजावून अशा मालमत्ता रिकाम्या करून घ्याव्यात”, असे ते म्हणाले. “जेव्हा बीएमसी नोटीस बजावते तेव्हा इमारती स्वतःच रिकाम्या केल्या पाहिजेत… अन्यथा, अशा घटना घडतात, जे दुर्दैवी आहे… यावर कारवाई करणे आता महत्त्वाचे आहे,” असेही  ठाकरे म्हणाले. चारही इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र तेथे लोक राहत असल्याचे त्यांनी सांगितले. “आमची प्राथमिकता सर्वांना वाचवणे आहे… आम्ही या इमारती रिकाम्या करणे आणि पाडणे याकडे लक्ष देऊ जेणेकरून आसपासच्या लोकांना आणखी त्रास होणार नाही,” असेही आदित्य  ठाकरे म्हणाले.

Continue Reading

Uncensored मराठी

मुंबईत १० जुलैपर्यंत कलम १४४ लागू; राजकीय नेत्यांची सुरक्षा आणखी मजबूत

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 27th June 2022

महाराष्ट्रातील सत्ताधारी युती भागीदार शिवसेना आणि त्यांच्या बंडखोर गटातील वाढत्या तणावामुळे, मुंबई पोलिसांनी शनिवारी शहरात पाच किंवा अधिक लोकांच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यास मनाई करणारी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम १४४ लागू केले आहे. तसेच राजकीय पक्ष आणि नेत्यांची कार्यालये आणि निवासस्थानाबाहेर पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत मुंबई पोलिसांनी जारी केलेले प्रतिबंधात्मक आदेश १० जुलैपर्यंत कायम राहतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

“शहर पोलिस कर्मचाऱ्यांना सतर्क राहून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय साधून सभा आणि राजकीय कार्यक्रमांदरम्यान त्यांचे कार्यक्रम, हालचाली आणि बंदोबस्त तैनात करण्यासंबंधीची माहिती अगोदर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्पेशल ब्राँचच्या अधिकार्‍यांना देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यास आणि आक्षेपार्ह मजकूर, संदेश, व्हिडिओ पोस्ट करताना आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सांगितले आहे, असे पोलिसांनी सांगितले. “राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कायदा हातात घेणार नाहीत, हिंसाचारात भाग घेणार नाहीत किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नाहीत याची काळजी घेण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनाही कुठेही आक्षेपार्ह बॅनर आणि होर्डिंग येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलीस आधीच हाय अलर्टवर आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे, असेही ते म्हणाले.

Continue Reading

Uncensored मराठी

जागेच्या गैरव्यवहार प्रकरणी वसईतील बिल्डर विनय शुक्ला विरोधात तक्रार; पोलिसांना घाबरत नसून जागा खाली न केल्यास जिवे मारण्याची धमकी..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 24th June 2022

वसई विरार व नालासोपारा येथील गावगुंड आणि विकासक यांची गुंडगिरी आपल्या नेहमीच कानावर येत असते. येथील बिल्डर लॉबी हि कायम गरम असते असे म्हणायला हरकत नाही. अनधिकृत बांधकामे, जमिनींचे व्यवहार, चाळी – इमारतींचे पुनर्वसन हे इकडचे नेहमीचेच विषय.

पाटील नगर, गोराई नाका, नालासोपारा पूर्व येथील रहिवासी रवींद्र यादव याने देखील अशाच बिल्डर च्या स्कीम ला बळी पडून तब्बल ७ लाख रुपये गमावून बसला आहे, शिवाय बेघर होण्याच्या भीतीने मानसिक व शारीरिक त्रासाने ग्रस्त आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये रवींद्रने स्थानिक बिल्डर विनय शुक्ला याच्या कडून सर्वे नं. ७८, गाळा नं. १ आणि २, मंगलमुर्ती चाळ, पाटील नगर, गोराई नाका, नालासोपारा (पुर्व) येथे सुमारे १५ लाख रुपयांना २ गाळे विकत घेतले होते ज्यातील रुपये ६,२५,०००/- आगाऊ रक्कम म्हणून देऊ केले शिवाय सुमारे १,२५,००० रुपये जागेच्या दुरुस्ती खर्च केले व उर्वरित रक्कम ३ महिन्यात देण्याचे सांगितले. सदर व्यवहारात कोणत्याही प्रकारचा करार झाला नाही. 

“पूर्ण पैसे दिल्यानंतर करार बनवून देईन.” असे बिल्डर विनय शुक्ला ने तक्रारदार रवींद्र यादव यास आश्वासन दिले. काही कारणास्तव ठरलेल्या वेळेत रवींद्र पैसे देऊ शकला नाही म्हणून त्याने बिल्डरकडे ६ महिन्यांची मुदत वाढवून मागितली, तत्पूर्वी सदर गाळे न कळत त्याने दुसऱ्या व्यक्तीला विकत दिल्याचे रवींद्र ने पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात सांगितले आहे. अशाप्रकारे तब्बल ७ ते ७.५ लाखांचा गंडा घालून बिल्डर विनय शुक्ला याने केवळ १,४८,०००/- परत करून जागा खाली करण्यास सांगितले. यावर रवींद्रने नकार दिला असता त्याला गाळा खाली न केल्यास सर्व सामान बाहेर फेकुन मारून टाकण्याची धमकी दिली. 

पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात सदर व्यक्ती हा असे सर्वांसोबत करत असल्याचे सांगितले, वेगवेगळ्या जागा दाखवून पैसे उकळणे, एकाच वेळी एकाहून अधिक व्यक्तींना जागा विकणे असे ह्या बिल्डरचे नेहमीचे कृत्य असल्याचे सांगितले. या बिल्डरला पोलिस व प्रशासनाचे भय नसून कोणी त्याचे काही करू शकत नाही असे रवींद्र ला सांगण्यात आले. व गावगुंडांच्या सहाय्याने रवींद्र व त्याच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. 

पश्चिम मुंबईतुन बहुतांश नागरिक हे वसई विरार कडे स्थलांतर करत असतात. त्याचप्रमाणे मुंबई बाहेरुन आलेले लोक सुद्धा येथे राहण्यास पसंती देतात. स्वस्त दरात घरे मिळण्याच्या अनेक स्कीम या भागात सुरूच असतात. अशाच स्कीम आणि ऑफर ला बळी पडून जनसामान्य आपल्या आयुष्यभराची पुंजी पणाला लावतो. आणि पैसा तर जातोच परंतु तो कायम स्वरूपी बेघर सुद्धा होतो. सदर विकासकांना कोणाचे भय नसल्यामुळे यात स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा असल्याचीही शक्यता उद्भवते.

Continue Reading

Trending